जळगाव (प्रतिनिधी) फुपनगरी येथे गृह मतदानासाठी आलेल्या पथकाकडून एका विशिष्ट पक्षास मतदान करून घेतल्याची खोटी माहिती प्रसारमाध्यमावर प्रसारित करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध मंडळ अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुलाब आनंदा कांबळे, आदित्य गुलाब कांबळे (दोघ रा. फुफनगरी, ता. जळगाव) यांच्यासह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग !
मंडळाधिकारी छाया कोळी या त्यांच्या पथकासह ८५ वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदार यांचे गृह मतदान घेण्यासाठी ४ मे रोजी फुपनगरी येथे आल्या होत्या. आनंदा सता कांबळे यांची गृह मतदानाची प्रक्रिया सुरू असताना एक व्यक्ती व्हिडिओ कॉल चालू ठेवून कांबळे यांच्या घरात जाताना दिसला. पथकाने त्याला रोखले पण, त्याने वाद घातला. नंतर पथक कानळदा येथे पुढील गृह मतदानासाठी पोहोचले. येथे दोन व्यक्तींनी पथकाला थांबवून तुम्ही घरोघरी जाऊन मतदान घेऊ नका, तुम्ही एका पक्षाला मतदान करण्यास सांगत असून घरातील सदस्यांना इतर मतदारांसोबत राहू द्या असे म्हणत वाद घालत शासकीय कामात अडथळा आणला. तसेच मतदारांसोबत मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी विशिष्ट पक्षास मतदान करना घेतल्याबाबत सर्वांसमोर अफवा पसरवून गैरसमज देखील निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे ही खोटी क्लिप प्रसारमाध्यमांना देखील प्रसारीत केली.
दोघांविरुद्ध दिली मंडळधिकाऱ्यांनी तक्रार !
मंडळधिकाऱ्यांसोबत असलेल्या पथकातील सदस्यांना निवडणुकीच्या कामात अटकाव करुन त्यांना दमदाटी करणाऱ्या गुलाब आनंदा कांबळे व आदित्य गुलाब कांबळे दोघ (रा. फुफनगरी) यांच्याविरुद्ध पुरावे नसतांना खोटी व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.