जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा कंत्राटदार महासंघातर्फे गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ जळगाव जिल्हा सु.बे. अध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांनी केले.
मागील दोन ते तीन वर्षांपासून कंत्राटदारांचे सर्वच लेखा शीर्षकांतर्गत शासनाकडे करोडो रुपयांचे देयके प्रलंबित आहेत. जवळपास सर्वच कंत्राटदारांनी ८० ते १०० टक्के कामे पूर्ण केलेली असतांना कंत्राटदारांसाठी शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी प्राप्त होत आहे. या अनपेक्षित प्रक्रियेचा आज अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्या कार्यालया समोर निषेध करण्यात आला. गेल्या दोन ते तीन वर्षापासून विकास कामांसाठी निधीच उपलब्ध नसल्याने कर्ज काढून विकास कामांना हातभार लावणारे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
सिमेंट, स्टील, डांबर व इतर बांधकाम साहित्याचे – पैसे, ठेकेदार पुरवठादारांना देऊ शकत नसल्याने विकास कामे बंद करावी लागत आहेत. कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शासन देयके अदा करत नसल्याने शेतकऱ्याप्रमाणे यापुढे कंत्राटदार सुद्धा नैराश्यातून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, त्यामुळे फेब्रुवारी २०२५ अखेर पर्यंत कंत्राटदारांची प्रलंबित बिले अदा करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाद्वारे जळगाव जिल्हा शाखा द्वारे देण्यात आला आहे. या मोर्चात विलास पाटील, प्रमोद नेमाडे, अनिल सोनवणे, सागर सोनवणे, रवींद्र माळी, हर्षल सोनवणे, वीरेंद्र पाटील, सुनील पाटील, सुधाकर कोळी, गणेश बोरसे, स्वप्नील शेंडे, चंद्रशेखर तायडे, कैलास भोळे यांच्यासह १०० शासकीय कंत्राटदारांनी मोर्चा सहभाग घेतला.
यंत्रसामुग्री डंपर, ट्रक, रोलर आणले कार्यालयात
कंत्राटदारांनी त्यांच्या मालकीचे डंपर, ट्रॅक्टर, रोलर, डांबरीकरण मशीनरी, काँक्रीट मिक्सर आदी यंत्रसामुग्री थेट सा. बां. विभागच्या आवारात आणले होते. यावेळी शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध नोंदवून घोषणा देखील देण्यात आल्या. कंत्राटदारांच्या विविध समस्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांना ह्या प्रसंगी देण्यात आले.