जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी दुध संघातील १४ मेट्रिक टन लोणी व ९ टन दुध पावडर अंदाजित चोरी व अपहार प्रकरणी पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण आणि दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये या दोन्ही गटाच्या तक्रारीचा प्राथमिक अभ्यास करून सरकारतर्फे रविवारी रात्री गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज (सोमवार) रोजी जळगाव न्यायालयाने एमडी मनोज लिमये यांची फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अपहार आणि चोरी प्रकरणात कोण-कोण आरोपीच्या पिंजऱ्यात येऊ शकतात?, याचीच जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरु आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय ?
आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वप्रथम ११ ऑक्टोबर रोजी चाळीसगावचे पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला होता. दूध संघातून सुमारे १४ टन लोणी (बटर) आणि आठ ते नऊ टन म्हशीच्या दुधाची भुकटी अशा सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे अर्जात म्हटले होते. ही विल्हेवाट दूध संघाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि काही मोजक्या कर्मचार्यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने लावलेली असल्याचेही अर्जात नमूद आहे. तसेच जिल्हा दूध संघाच्या फिनिश प्रॉडक्ट विभागाच्या रेकॉर्डला १४ टन बटर अर्थात लोणी पाठवल्याची नोंद २ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आली आहे. सदरील बटर हे अतिरिक्त प्रॉडक्ट असल्यामुळे इतरत्र असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जसे की यामध्ये सातारा येथील पी. डी. शहा अँड सन्स वाई या ठिकाणी पाठविण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतू तेथून परत आलेला मालात ७० ते ७५ टक्के हा विकास अर्थात जिल्हा दूध संघाच्या प्रॉडक्शन नव्हता. यामध्ये जिल्हा दूध संघाचे फक्त शंभर ते दीडशे खोके आढळून आले. उर्वरित माल हा बिना खोक्याचा आहे. म्हणजेच जळगाव दूध संघाचे पॅकिंगचा नाही.
यांच्याविरुद्ध होऊ शकतो गुन्हा दाखल
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत चेअरमन, कार्यकारी संचालक व काही मोजक्या कर्मचारी यांनी अत्यंत हुशारीने व नियोजनबद्ध रित्या विकायचे असलेले चांगल्या प्रतीचे व ब्रँड असल्यास मागणी असलेले बटर अर्थात लोणी हे परस्पर विकून टाकलेले असून दूध संघाचे फसवणूक केली आहे. असाच प्रकार ८ ते ९ मॅट्रिक टन दुधाची भुकटीचाही देखील झालेला आहे. तो देखील गायब झाला असून त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे. त्यामध्ये देखील दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आ. चव्हाण यांनी म्हटले आहे. थोडक्यात अपहारसंबंधित या तक्रारीत चेअरमन, कार्यकारी संचालक आणि काही कर्मचारी आरोपी होऊ शकतात. दुसरीकडे यामुळे शिंदे सरकार पेचात सापडू शकते?, अशी एक चर्चा होती. परंतू आमदार मंगेश चव्हाण यांच्या तक्रारीत चेअरमन, कार्यकारी संचालक व काही मोजके कर्मचारी असा उल्लेख आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार अडचणीत येतील आणि त्यामुळे राजाश्रय मिळेल,अशी अपेक्षा धूसर असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्या तक्रारीत नेमकं काय?
कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, काेजागरी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७ आॅक्टाेबर राेजी कार्यकारी संचालक मनाेज लिमये यांनी प्लांटची पाहणी केली. त्यावेळी दूध भुकटी आणि लाेणीसाठ्यात तफावत आढळली. तसेच वाई येथील शीतगृहातील साठ्यामध्येही तफावत आहे. तसेच १४ मेट्रिक टन लोणी व ९ न दुध पावडर अंदाजित चोरी व अपहाराची किंमत एक कोटी पंधरा लाख आहे. त्यामुळे कोजागिरी व दिवाळी सणांच्या निमित्ताने लोणी व दूध भुकटी साठा दूध व तूप मागणीची पुर्तता करण्यााठी मागणी नुसार पुरेसा उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी म्हणून तपासणी करण्याचे ठरविले. दिनांक 8 ऑक्टोंबर, 2022 रोजी रात्री 9.30 वाजता लिमये यांनी संदिप झाडे, स्वप्निल जाधव, रवी वानखेडे, नितिन पाटील व महेंद्र केदार यांना विक्री विभागातील पांढर्या लोण्याचा प्रत्यक्ष साठा याची अचानक तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी माझ्या आदेशाप्रमाणे संपूर्ण विक्री विभागाची स्टॉक तपासणी केली. त्यात त्यांना असे निदर्शनास आले की, दिनांक 2 ऑक्टोबर, 2022 रोजी 14 टन पांढरे लोणी (700 बॉक्स) ज्याची अंदाजित किंमत रु. 70-80 लाख आहे. संघाच्या बाहेर वाई, जिल्हा सातारा येथे शीतगृहात पाठविल्याची नोंद साठा रजिष्टरमधे घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात असे कोणतेही वाहन माल लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेल्याची नोंद गेट इन व आऊटचे रजिष्टरमधे मिळून आली नाही आणि त्याबद्दल प्रचलीत कार्यप्रणाली नुसार इतर कोणत्याही रेकॉर्डमधे अशा प्रकारे वाहन माल घेवून बाहेर गेल्याबद्दल नोंदी आढळून आल्या नाहीत. यावरुन प्रथमदर्शनी असे निदर्शनास आले की, प्रत्यक्ष पांढरे लोणी स्टॉक मधे रेकॉर्डपेक्षा कमी असल्यामूळे असलेली घट लपविण्यासाठी दिनांक 2 ऑक्टोंबर, 2022 रोजी पांढरे लोणी वाई, जिल्हा सातारा येथील शीतगृहात पाठविल्याची खोटी नोंद घेतलेली आहे.
पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन चुकीची फिर्याद नोंदविली
दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचे वकील अॅड. अतुल सुर्यवंशी यांनी दुध संघाशी निगडीत सर्व बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून देत पोलिस न्यायव्यवस्थेशी मस्ती करत आहे व आम्ही किती वरचढ आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केल्यावरही गुन्हा दाखल न करणारे पोलिस यांना सोमवारी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघण्याचादेखील वेळ नव्हता आणि रविवारीच सकाळी ३.१५ च्या सुमारास फिर्याद दाखल करण्याचा साक्षात्कार कसा झाला ? व गुन्हा घडल्यानंतर जर कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसेल किंवा कोणी फिर्याद देत नसेल तरच पोलिसांना स्वतःहून फिर्याद देण्याचा अधिकार आहे. याठिकाणी कार्यकारी संचालक हे फिर्याद देणारे अधिकृत व्यक्ती आहेत. आरोपींची नावेदेखील स्पष्ट आहेत. तरी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन चुकीची फिर्याद नोंदविली असे निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने गनिमी कावा ओळखून फिर्यादी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करुन नंतर चौकशी करण्याचे आदेश पारीत केले, अशी माहिती फिर्यादी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचे वकिल अॅड. अतुल सुर्यवंशी यांनी दिली आहे.
लिमये यांच्या तक्रारत कोणावर ठेवलाय नेमका ठपका !
दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी संशयित आरोपी अनंत अशोक आंबिकर, महेंद्र नारायण केदार व सुनिल चव्हाण यांच्याविरुद्ध जळगाव येथील मे. 1. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात फौ. कि. अर्ज नं.८४३/२०२२ हा दि.१५/१०/२०२२ रोजी भादंवि कलम ३८९, ४०३, ४०६, ४०८, ४२०, ४६५, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन यांना देण्यात यावा, असा अर्ज दाखल केला होता. त्यावर कोर्टाने सुनवाईअंती फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करुन नंतर चौकशी करण्याचे आदेश पारीत केले असल्याची माहिती अॅड. अतुल सुर्यवंशी यांनी दिली आहे. लिमये यांच्या तक्रारीत संशयितांची नावं स्पष्ट आहेत. तर दुसरीकडे आमदार यांच्या तक्रारीत नावां ऐवजी संशयितांची पदनाम स्पष्ट आहेत. थोडक्यात अपहार प्रकरणात चेअरमन, कार्यकारी संचालक व काही मोजके कर्मचारी तर चोरी प्रकरणात दुध संघातील फक्त कर्मचारी रडारवर असणार आहेत.