जळगाव (प्रतिनिधी) पॅरोल रजेचा गैरफायदा घेत 16 वर्षांपासून फरार असलेल्या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटककेली आहे. त्या आरोपीला पुणे येथील शिरूर येथून अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ बाजार पेठे येथे सन १९९७ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात आरोपी भगवान हिरामण सपकाळे (वय-५०, रा. दिनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) याला शिक्षा झाली होती. त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना २ जून २००६ रोजी पॅरोलची सुट्टी देण्यात आली होती. मात्र तो, सुट्टी दिल्यापासून पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाला होता.
यासंदर्भात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात बंदी कैदी फरार झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या सोळा वर्षांपासून फरार असलेला कैदी हा पुण्यातील शिरूर येथे असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी माहितीच्य आधारे सहकारी पोलीस अंमलदार पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पो. ना. रणजित जाधव, पो. ना. किशोर राठोड, विनोद पाटील, चालक पो. कॉ. मुरलीधर बारी यांनी पुणे गाठले. सापळा रचून फरार कैदी भगवान सपकाळे याला अटक केली. पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.