जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर खरेदीत कोट्यांवधीचा घोटाळा झाल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते दिनेश भोळेंनी केली होती. पुरवठा केलेले व्हेंटिलेटर तांत्रिक विनिर्देशानुसार नसल्याचे आढळल्यामुळे खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जर हे खरे असेल तर मग पैसे परत का मिळाले नाहीत?. संबंधित पुरवठादार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही?. या घोटाळ्यातील सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे तक्रारदार भोळेंनी निवेदन देऊनही दोष सिध्द आढळून आलेले व्हेंटिलेटर सिलबंद का करण्यात आले नाहीत?,व्हेंटिलेटर परत करण्याची घाई, ही पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तर नाही?, असे अनेक गंभीर प्रश्न या घोटाळ्यासंबंधी आता उपस्थित केले जात आहेत.
खरेदीची प्रक्रिया नियमानुसारच तर अनियमितता कशी झाली ?
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स, (Ventilators,) ऑक्सिजन काँसनट्रेटर, (Oxygen Concentrator,) मॅमोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झालेला नाही. त्याची खरेदी प्रक्रिया ही नियमानुसारच झाली असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण (District Surgeon Dr. N.S. Chavan) यांनी नुकताच एला पत्रकार परिषदेत केला होता. तर दुसरीकडे याप्रकरणी शिवसेनेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदमध्ये चार प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर देतांना जळगाव जिल्ह्यामध्ये ३० व्हेंटिलेटर खरेदीमध्ये अनियमितता झाली असल्याबाबतचे जिल्हाधिकारी जळगाव यांचे दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजीचे पत्र प्राप्त झाले असल्याचे म्हटले. जिल्हा शल्यचिकित्सक जर खरेदीची प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचे म्हणताय तर मग आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी विधानपरिषदमध्ये अनियमितता झाली असल्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचा पत्राचा दाखला का दिला?
…मग त्रिसदस्यीय समितीकडून दुसऱ्यांदा चौकशी का?
व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रियेबाबत दुसऱ्यांदा चौकशीकरिता बुधवारी नाशिक आरोग्य उपसंचालकांनी नियुक्त केलेली त्रिसदस्यीय समिती जिल्हा रुग्णालयात येऊन गेली, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. दंडाळ यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन काँसनट्रेटर, मॅमोग्राफीमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झालेला नसल्याचे म्हणताय. तर समिती दुसऱ्यांदा चौकशी करायला का आली?, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच व्हेंटिलेटर तांत्रिक विनिर्देशानुसार न देणाऱ्या पुरवठाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी मोठी लॉबिंग सुरु असल्याची चर्चा आहे.
व्हेंटिलेटर सिलबंद तक्रारदार भोळे यांनी ऑगस्ट महिन्यात दिले होते पत्र
तक्रारदार दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारींना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, सदर खरेदी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण यांच्या पुरवठा आदेशाने लक्ष्मी सर्जीकल अॅण्ड फार्मा यांना १५ व्हेंटीलेटर अॅडल्ट अॅण्ड १५ व्हेंटीलेटर पेडीयॉट्रीक पुरविणे अपेक्षित असतांना त्या ठिकाणी मॉडेल व बँण्ड यात मंजुर निविदा व प्रत्यक्षात पुरविण्यात आलेल्या व्हेंटीलेटरमध्ये प्रचंड अशी तफावत आढळून आलेली आहे. संबंधित निविदा रु.३ कोटी ७१ लाख ५४ हजार १३० रूपये एवढ्या किंमतीची असे म्हटले होते.
व्हेंटीलेटरची अनधिकृतपणे विल्हेवाट लावण्याची तक्रारदाराने आधीच व्यक्त केली होती भीती
पुरविण्यात आलेले व्हेंटीलेटर यावर दोषसिध्द झालेला असल्याकारणाने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्विकारलेले व्हेंटीलेटर हे मोहाडी महिला रूग्णालय येथे ठेवण्यात आलेले आहे. व त्याच ठिकाणी त्यांची चौकशी झालेली आहे. तरी अद्यापपर्यंत आपणामार्फत संबंधित निविदाधारक लक्ष्मी सर्जीकल अॅण्ड फार्मा यांच्यावर व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर कुठलीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कारवाई अथवा गुन्हे दाखलचे आदेश झालेले नसल्याकारणाने संबंधित यंत्रणा व पुरवठाधारक हे त्या व्हेंटीलेटरची अनधिकृतपणे विल्हेवाट अथवा त्या ठिकाणाहून हलविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती देखील तक्रारदार भोळे यांनी ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली होती. तसेच विनंती केली होती की, पोलीस प्रशासनामार्फत ते ३० व्हेंटिलेटर कायदेशीर अथवा प्रशासकीय कार्यवाही किंवा गुन्हे दाखलची प्रक्रिया पुर्ण होत नाही. तोपर्यंत सिलबंद करण्यात यावी. तसेच ७ दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल किंवा प्रशासकीय कारवाई न झाल्यास मला वैयक्तिकरित्या पोलीसात तक्रार व कोर्टात खटला दाखल करण्याची अनुमती मिळावी, असेही भोळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. एवढेच नव्हे तर आता व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द केली गेली म्हणून भ्रष्टाचार होत नाही असे म्हणता येणार नाही,असेही भोळे यांचा आरोप आहे.
खरेदी प्रक्रिया रद्द झाली मग शासनाचा पैसा कुठं आणि कुणाकडे आहे ?
मुळात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया रद्द केली गेलीय. तर मग परत आलेला निधी कोणत्या खात्यात परत करण्यात आला?. शासनाचा पैसा कुठं आणि कुणाकडे आहे ?, या प्रश्नांचे उत्तरे अद्याप देण्यात आलेली नाहीय. व्हॉटलेटरची निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर डीपीडीसीमधून जिल्हा कोषागार कार्यालयात गेलेला निधी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नावाच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बँक खात्यातून ३० व्हेंटीलेटरचा प्रत्येकी १२ लक्ष ३८ हजार ४७१ रुपयेप्रमाणे ३ कोटी ७१ लाखांचा हा निधी संबंधित लक्ष्मी सर्जिकल कंपनीच्या बँक खात्यावर वर्ग केला असेल तर व्हेंटीलेटर पुरवठादाराने १०० टक्के रक्कम आगाऊ घेतल्याचे निविदा प्रक्रियेमधील कागदपत्रांवरून दिसत आहे. व्हेंटीलेटर खरेदी निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर लक्ष्मी सर्जिकल कंपनीकडून हा निधी पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बँक खात्यावर किंवा थेट शासकीय खात्यावर परत पाठविण्यात आला असणार त्याबाबतचा बँकेचा खाते तपशील तक्रारदार दिनेश भोळे यांनी जिल्हा रुग्णायल प्रशासनाकडे तोंडी स्वरूपात मागितलेला आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी सर्जिकलशी झालेल्या व्यवहाराची खरेदी प्रक्रिया रद्द केल्याचे कागदपत्रे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध असतील ती तक्रारदार दिनेश भोळे यांना का दिली जात नाहीय?. त्यामुळे तसेच परत आलेला निधी कोणत्या खात्यात परत करण्यात आला? हा प्रश्न कायम आहे.