जळगाव (प्रतिनिधी) नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी, मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व, सायबर सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, किमान कौशल्य, स्किल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, स्वयंरोजगार निर्मितीसह, सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेला नाटिकेतील प्रत्येक क्षण उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना रोमांचकारीचा अनूभव देत होता.
अनुभूती निवासी स्कूलचा नॅशनल एज्युकेशन पॉलिशी 2020 (NEP) या थीमवर आधारित ‘फाउंडर्स डे’ हा अनुभूती स्कूल चे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित असतो तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरस्वती वंदना व दीपप्रज्वलनाने सांस्कृतिक कार्यक्रमासह नाटिकेला सुरवात झाली. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव, प्राचार्य देबासिस दास व सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत 12 वी व 10 उत्तीर्ण झालेल्यांचा तसेच गांधी विचार संस्कार परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. ३ ते ६ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अनुभूती स्कूलचा आगामी माँटेसरी विचारधारेवर आधारीत प्री-स्कूल प्रोजेक्टविषयी गायत्री बजाज यांनी अवगत केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील विद्यार्थ्यांनी सचित्र पेटिंग साकारले.
आरंभी योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, केरळ, उत्तराखंड मधील पारंपारिक नृत्य सादर करून राष्ट्रीय एकात्मकतेचा जागर केला. दक्षिण भारतातील कथ्थक नृत्य, वाघ नृत्याने समारोप झाला. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी तुषार, वेदिका, राज, अवयुक्त, अनुष्का, प्राप्ती यांनी सुत्रसंचालन केले.
सर्व समावेश मुल्यशिक्षण संस्कारीत करणारी अनुभूती स्कूल – आयुष प्रसाद
विद्यार्थ्यांमध्ये भावनिकता, संवेदनशीलता संस्कारीत झाली पाहिजे. त्यासाठी निवासी शाळांमध्ये खूप आव्हान असते कारण पालकांचा सहवास कमी असतो. मात्र अनुभूती स्कूल याला अपवाद असून येथील विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, एकमेकांमध्ये परस्परभाव याबाबतचा आत्मविश्वास दिसतो. यामध्ये पालकांचा स्कूलबद्दल असलेला विश्वास अधोरेखित करण्यासारखा आहे. सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यासह सर्व समावेशक मूल्यशिक्षण पुरस्कार करणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिशीच्या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमासह ‘फाउंर्डस डे’ साजरा करणारी अनुभूती महाराष्ट्रातील पहिलीच स्कूल आहे, असे मनोगत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.