मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काल (दि. २५) शिवसेनेचा दसरा मेळावा मर्यादित नेतेमंडळी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे व राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या भाषणामध्ये चौफेर टोलेबाजी केली. शिवसेना व राज्य सरकारच्या टीकाकारांनाही त्यांनी चांगलेच सुनावले आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा देखील ठाकरे यांनी समाचार घेतला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या वक्त्यव्यावर आता कंगनाने सुद्धा ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असं विधान कंगनानं केलं आहे. कंगना सतत ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले –
“रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीयेत. इकडे सगळे नशिले आहेत. ही कसली रावणी औलाद.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काश्मीर मध्ये अधिकृत 1 इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं. वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी कानांचा समाचार घेतला.