उस्मानाबाद (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतू खडसेंचे भाजपच्या उभारणीत मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचे भाजपच्या उभारणीत मोठे योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असे त्यांना वाटते, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असे त्यांनी सांगितले आहे. तर पक्ष सोडलेल्यांना परत घेण्याबाबत शरद पवारांनी गेलेत तिथे सुखी राहा असा संदेश दिला आहे. दुसरीकडे काल खडसे यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. परंतू बाबांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांनी दिली होती. रविवारी दिवसभर एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची बातमी माध्यमात झळकली होती, मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला होता.