मुंबई (वृत्तसंस्था) पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी जावयाच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने समन्स बजावलं होते. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. मात्र, पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथराव खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसेंना रद्द करावी लागलेली आहे.
भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना परवा मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावलं.
















