सोलापूर (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांना थेट आव्हान दिलंय. तसेच अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल सोमय्या यांनी केलाय.
किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये. माझ्याकडे पुरावे आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?”
बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का? ते शरद पवार यांना मान्य आहे का?” असा थेट सवाल यावेळी किरीट सोमय्या यांनी केला. तसेच “माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत. यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावं,” असं आव्हान किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबाला दिलं.