पंढरपूर (वृत्तसंस्था) राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्टकरी, समाजातील सर्व घटकांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं जावो, कोविड संकट कायमस्वरुपी जावं. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. राज्यातील बळीराजा, कष्टकरी, समाजातील प्रत्येक घटकांना सुख समृद्धी मिळो. राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा. गोरगरीब सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला साकडं घातले.
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्यात आली. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे,एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी आणि श्रीकांत शिंदे यांचा मुलगा अशा चार पिढ्यांनी पांडुरंगाची मनोभावे पूजा केली. यंदाच्या विठ्ठलाच्या पुजेचा मान गेवराईच्या नवले दांपत्याला मिळाला. त्यांनीही मुख्यमंत्र्यांसमवेत पांडुरंगांची पूजा केली. महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातल्या १२ कोटी जनतेच्या वतीनं आपण ही पूजा करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याच्या विकासाची पताका उंच फडकू दे, राज्यात बळी राजाला चांगले दिवस येऊ दे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. त्याशिवाय राज्यात पावसानं चांगलाच जोर पकडला आहे मात्र पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवणार नाही अशी अपेक्षा त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली. राज्यात मोठे प्रकल्प उभे करा तुम्हाला कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता होणार नाही असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत.
राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यात होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी आपण निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळं लागेल ती मदत वारकऱ्यासांठी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. हा पांडुरंग सर्वसामान्यांचा देव आहे. यासाठी जे काही लागेल ते शासन देईल, असं शिंदे म्हणाले. गेली ३५ वर्ष पंढरीची वारी करणाऱ्या बीडच्या गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई नवले या दांपत्याला विठ्ठल पूजेचा मान मिळाला. या प्रसंगी बोलताना नवले दांपत्यानं समाधान व्यक्त केलं.