नाशिक (वृत्तसंस्था) देशात १०० कोटी लसीकरण झाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा सपेशल खोटा असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे संपर्कनेते खासदार संजय राऊत यांनी केला. देशात २३ कोटी लोकांचेच लसीकरण झाले असून, त्याचे पुरावे आपण सिद्ध करू, असे आव्हान त्यांनी केले.
एकीकडे चीनी सैन्य भारतात घुसखोरी करत आहे.जम्मू-काश्मिरमध्ये हिंदूंचं हत्याकांड सुरु आहे. तर दुसरीकडे देशात लसीचे उत्सव साजरे केले जात आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलीय. वाढती महागाई, पेट्रेल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी बोलत नसल्याचंही राऊत म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केले. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मदनलाल धिंग्रासारखे लोक निर्माण केले. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. त्यासाठी माझं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना आवाहन आहे. सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलंय.