मुंबई (वृत्तसंस्था) राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राजभवनातून गायब झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांवर एकच टीकेची झोड उडवली होती. त्यानंतर आता १२ आमदारांची यादी राजभवनात सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजभवनाकडे विधान परिषद १२ सदस्यांची यादी आपल्याकडे आहे, असा दावा राजभवन सूत्रांनी दिली. यादी हरवली नाही, विनाकरण गैरसमज करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने माहिती अधिकार विभागात माहिती मागितली त्या विभागाकडे लिस्ट नावे नव्हती त्यामुळे त्या विभागाने त्यांच्याकडे सदस्य नावे नाहीत, असे उत्तर दिले, अशी सारवासारव राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तसंच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली, असे राज्यभवनातील अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली.
गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरला महाविकासआघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे १२ आमदारांच्या नावांची यादी मागितली होती.
मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरुन राजकारण सुरु झाले होते. अखेर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले होते. मात्र, आता १२ आमदारांची ही यादी राजभवनातच असल्याने राज्यपाल कोश्यारी त्याबाबत काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.