मुंबई (वृत्तसंस्था) “मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका सलूनचालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या उस्मानपुरा येथे घडली. मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी करत प्रेतासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राज्यात अक्षरशः अराजक माजलं असल्याचं म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झाले आहे. केशकर्तनालय उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी औरंगाबादला प्राण जाईपर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. राज्यात अक्षरशः अराजक माजलं आहे,” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
सलून चालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू
औरंगाबादमध्ये उस्मानपुरा भागातील पीरबाजार परिसरात केशकर्तनालय चालकाचा मृत्यू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्धवट शटर लावून आतमध्ये कटिंग, दाढी सुरू असल्याच्या संशयावरून केशकर्तनालय चालक फेरोजखानला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत फेरोजखान याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. यामुळे परिसरात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
मृत फेरोजखान याचा मृतदेह सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. शवविच्छेदनासाठीही नातेवाइकांनी विरोध केला होता. फेरोजखान याचा मृत्यू पोलिसांनी मारहाण केल्यामुळे झाल्याचा आरोप करत संबंधिताना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तारे व अन्य दोन कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी जोडून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतरही नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलीस निरीक्षक तारे यांच्यासह कर्मचाऱ्यांना निलंबितच करावे, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, मृताचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे सत्य बाहेर येईल व त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.
शहरातील काही पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी, दंगा काबू पथक आदी घटनास्थळी तैनात होते. खासदार इम्तियाज जलील यांनीही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या उद्घोषक यंत्रावरून खासदार जलील यांनी शांततेचे आवाहन केले. अखेर सायंकाळी फेरोजखान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीमध्ये नेण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.