नवी दिल्ली (वृत्तसंस्था) त्रिपुरात काही घडले तर महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात काही घडण्याची गरज होती असे मला वाटत नाही. काही शक्ती परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटते की त्या जातीयवादी शक्ती आहेत आणि त्यांच्या पासून सतर्क राहण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
गेल्या शुक्रवारी काही मुस्लीम संघटनांनी त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचाराविरोधाचा निषेध करत शांततामय मार्गानं आंदोलन केलं होतं. या दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव यांसहीत इतर काही शहरांत मुस्लीम संघटनेच्या आंदोलकांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेबद्दल शरद पवार बोलत होते. महाराष्ट्रात उसळलेल्या या हिंसाचाराबद्दल शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. ‘त्रिपुरात काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत उमटावी, असं मला वाटत नाही. काही शक्ती या स्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं त्या जातीयवादी शक्ती आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे’, असं शरद पवार यांनी म्हटलंय. बुधवारी, दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.