जळगाव (प्रतिनिधी) WIFA अर्थात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजेच महाराष्ट्र फूटबॉल बॉडी ची ७२ वी सर्व साधारण सभा पुणे येथील भारती विद्यापीठात अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यात एकूण ३६ जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
व्यासपीठावर उपाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, दुसरे उपाध्यक्ष व राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम, तिसरे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजी राजे छत्रपती सह सचिव सॉर्टर वाझ, खजिनदार प्यारेलाल चौधरी उपस्थित होते. एकूण ७ ठराव सर्व संमतीने पारित झाले. आयत्या विषयावर जिल्ह्यातील अडचणी मांडतांना जळगाव जिल्ह्याचे सचिव फारूक शेख यांनी राष्ट्रीय व खास करून संतोष ट्रॉफीसाठी मुंबई, पुणे, नागपूर सोडून इतर जिल्ह्यातील फक्त २ महिला व पुरुष खेळाडूंना प्रवेश दिला जातो ती संख्या अत्यंत कमी असून ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून ती संख्या वाढवून देण्यात यावी, त्यास इतर जिल्ह्यांनी सुद्धा अनुमोदन दिले असता पुढच्या वेळेपासून प्रत्येकी ५ पुरुष व महिला खेळाडूना संधी देण्याचे अध्यक्ष पटेल यांनी घोषित केले.
तसेच फेब्रुवारी २०२१ मधील आशिया फूटबॉल स्पर्धा व २०२२ च्या १७ वर्ष वयोगटातील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी फुटबॉलचा प्रचार व प्रसारसाठी फुटबॉल असो व शासन यांच्या सयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी सूचना सुद्धा फारूक शेख यांनी मांडली असता त्यास दोन्ही मंत्री आदित्य ठाकरे व विश्वनाथ कदम यांनी मान्यता दिली. फारूक शेख यांनी जिल्ह्याचा अहवाल सचिव सॉर्टर वाझ यांना सादर केला व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाची मागणी केली असता ती सुद्धा मान्य करण्यात आली आहे.