मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. ‘लखीमपूरची घटना अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्यांचा मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारले आहे. यात त्याचा सहभाग दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारणं असं कुठेही सरकारनं केलं नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं केलं आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
‘या घटनेचा निषेध म्हणून आम्ही ११ ऑक्टोबरला राज्यात बंद पुकारत आहोत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल चर्चा झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे’, असंही पाटील यांनी सांगितलं.