जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणच्या प्रत्येक कार्यालयावर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे.
याबाबत सर्व कार्यालयांना मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी निर्देश दिले आहेत. जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणच्या सर्व मंडल, विभाग, उपविभाग, कक्ष कार्यालयावर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान तिरंगा ध्वज फडकवावा व त्यासाठी आवश्यक असलेल्या ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश मुख्य अभियंता हुमणे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
याबरोबरच महावितरणने ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे. वीज व विजेचे बिल दोन्ही कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या घरात वीजबिल फाईल संग्रही असतेच. त्यामुळे महसुली पुरावा म्हणून ग्राह्य नसतानाही बँका एखाद्याला मालमत्तेचा जिवंत पुरावा म्हणून लाईटबिल मागतात. विजेचा युनिटमधील वापर त्या कुटुंबाचा आर्थिक स्तरसुद्धा ठरवते.
केंद्र सरकारलाही वीजबिल हे प्रत्येक घराघरांत तिरंगा पोहोचविण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम वाटले. जसे निर्देश केंद्राकडून मिळाले, तोच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तातडीने पावले उचलत सर्व वीजबिलांवर तिरंगा लावण्याचे ठरवले. अन् अवघ्या काही दिवसांत त्या-त्या भागातील ‘बिलिंग सायकल’नुसार प्रत्येकाच्या घरी तिरंगा पोहोचविण्याचे काम महावितरणने केले आहे.