जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने ‘शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी याची योग्य ती प्रचार आणि प्रसिध्दी करावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौर्याच्या पार्श्वभूमिवर, येणार्या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 27 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर येथील नियोजन भवनात पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, लताताई सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उप वनसंरक्षक विवेक होशींग, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, नपाचे जनार्दन पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे आदी उपस्थित होते.
या दौर्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनातील २७ वरिष्ठ अधिकार्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जोडीला सुमारे ६० उप नोडल अधिकारी देखील काम करणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत सादरीकरण केले. खासदार उन्मेष पाटील यांनी कृषी सहायक आणि तलाठी यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन करण्याचे आवाहन केले. आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्व अधिकार्यांनी दिलेल्या जबाबदार्या पार पाडण्याचे आवाहन केले. आमदार सुरेश भोळे यांनी वीज पुरवठा तसेच पार्कींगबाबत सूचना केल्या.
आढावा बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, त्या-त्या विभागाचे अधिकारी यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी येणार्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी पार्किंग, भोजन व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था ठेवावी, उपस्थित राहणार्या दिव्यांग लाभार्थ्यांची स्वतंत्र्य व्यवस्था करावी. आरोग्यसुविधा उपलब्ध ठेवावी. तसेच जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी.
यासोबत पोलीस यंत्रणेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांचे प्रोटोकॉल प्रमाणे सुरक्षा व्यवस्था ठेवावी, कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयोजन करावे. 35 हजारांपेक्षा पेक्षा जास्त उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिका व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, कार्यक्रम स्थळी प्रोटोकॉल व वेळेचे बंधन पाळावे, सूक्ष्म नियोजन करून शासन आपल्या दारी हा क्रांतिकारक उपक्रम १००% यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या बैठकीत केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी कृषी, महावितरण, महसूल आदी विविध खात्यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून याचे नियोजन देखील व्यवस्थित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर रोजगार मेळावा, आरोग्य शिबिर, कृषि प्रदर्शन यांचे नियोजन करावे.
यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. तसेच या परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवरून पालकमंत्र्यांसह मान्यवरांनी फोटो देखील काढले. बैठकीचे सूत्रसंचालन निवास उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले.