चाळीसगाव (प्रतिनिधी) – आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव ते पंढरपूर वारी हा एक अतिशय चांगला उपक्रम असून पंढरपूर दर्शन हे प्रत्येकाचे स्वप्न असतं, इच्छा असतं पंढरपूरला जाण्याची. पांडुरंगाचे दर्शन घेण्याची चंद्रभागांमध्ये स्नान करण्याची. चाळीसगावच्या जनतेची इच्छा, आकांक्षा व स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमदार मंगेश दादा करत आहेत. त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा नावलौकिक सर्व महाराष्ट्रात आहे. मंगेश दादांच्या रूपाने तालुक्याला दिलदार आमदार लाभल्याचे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा व आपत्ती विभागाचे मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी काढले आहेत.
चाळीसगाव ते पंढरपूर विठाई एक्स्प्रेस या विशेष रेल्वेच्या माध्यमातून 4 हजाराहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाली. त्याप्रसंगी वारीच्या प्रस्थान सोहळ्यास राज्याचे मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांनी पालखीला खांदा दिला तसेच विशेष रेल्वेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवून पंढरपूर कडे रवाना केले, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते, यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, नाशिक भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्यामकांत सोनवणे, सरस्वती डेअरी संचालक मुकेश टेकवाणी यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण हे जरी माझ्यापेक्षा वयाने लहान असतील तर त्यांच्या अनेक कामांचा हेवा मला वाटतो. गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे नियोजनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने वारीचे महात्म्य जवळून अनुभवत आहे. पंढरपूरची वारी एक चांगला उपक्रम असून मी देखील माझ्या मतदारसंघातील वारकऱ्यांना पुढील आठवड्यात विशेष पंढरपूर दर्शन घडवणार आहे. खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश दादा व त्यांचं काम असल्याचेही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
समाजकार्यासाठी विठ्ठलाचा आशिर्वाद व गिरीशभाऊ यांची प्रेरणा – आमदार मंगेश चव्हाण
लोकप्रतिनिधी या नात्याने विकास कामे होत राहतील मात्र पंढरपुर येथे जाऊन श्री. विठ्ठलाचे दर्शन वारकऱ्यांना करून आणणे ही माझ्यासाठी जीवनात महत्त्वाची बाब असल्याची भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तालुक्यातील मायबाप जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, ही वारी ही कुटुंबाची वारी आहे. वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घडवून आणणे ही सेवा असून या सेवेतूनच खर विठ्ठलाचे दर्शन होत असल्याचे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. ज्यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून मला कामाची ऊर्जा मिळते ते राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची पाठीवरील कौतुकाची थाप निश्चितच मोलाची असून त्यांच्या पाठबळामुळे हे सर्व शक्य होत आहे. या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या नियोजनासाठी सलग 17 तास गिरीश भाऊ महाजन उभे होते, ही दैवी शक्तीच आहे.
समाजकार्याचे बळ मला श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने व गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेने मिळते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
खासदार स्मिताताई वाघ यांनी वारक-यांना वारीसाठी शुभेच्छा दिल्यात,चाळीसगांवच्या वारीचा उपक्रम निश्चितच आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे वेगळेपण दाखवणारा आहे. चाळीसगांव मतदार संघातील नागरिक खरोखरच भाग्यवान आहेत, त्यांना आमदार मंगेश दादांच्या रूपाने कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी लाभला आहे असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले तर जिल्हा बँक चेअरमन संजय पवार यांनी दिलेला शब्द पाळणारा आमदार मंगेश दादांचे नाव ओळखले जाते जळगाव भाग्यवान आहेत की त्यांना आमदार मिळाला एक वारकरी पुत्रच अशा पद्धतीने काम करू शकतो विठ्ठलाचा आशीर्वाद व सर्व सामान्य चाळीसगावकर यांची साथ मंगेश दादांना आहे तोपर्यंत त्यांचे स्थान कोणीही हटवू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूर येथे चाळीसगाव मतदारसंघातून गेलेल्या 4000 भाविकांच्या दोन वेळा जेवणाची व्यवस्था श्री शनी महाराज मठ येथे करण्यात आली आहे, चाळीसगाव हुन पंढरपूर जाताना व पंढरपूर हुन चाळीसगाव येताना रेल्वे मध्ये जवळपास १२००० पाणी बॉटल्स, औषधोपचार पेटी आदी अत्यावश्यक सोयी सुविधा आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. भाविकांची वारी सुखकर व निरोगी व्हावी यासाठी संपूर्ण काळजी घेण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून भाजपा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.