मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. तसेच शिवसेना भवनातून अनेक सेलिब्रिटींना फोन जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तर दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांचा उल्लेख करत त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर दोन-तीन लाख आणि मोठे असतील तर १०-१५ लाख इतके पैसे दिले जात आहेत,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकार कोरोनाचे खरे आकडे लपवत आहे. त्यांना राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही.
“एका बाजूला लोकांना देण्यासाठी, ऑक्सिजनसाठी पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे भीक मागत असतात. दुसऱ्या बाजूला स्वत:ला मेकअप लावण्यासाठी सगळ्या कलाकारांना कामाला लावतात. फोन करुन त्यांच्यावर दबाव आणले जातात. एका बाजूला गरिबी दाखवून दुसऱ्या बाजूला स्वत:वर खर्च करता हा खोटारडेपणा नाही का?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या खरोखरच कमी झाली असती तर अनलॉक झाले पाहिजे होते. दुकाने आणि इतर व्यवहार सुरु करायला परवानगी दिली पाहिजे होती. पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मग उरलेल्या १५ दिवसांत लोकांना पैसे कमवू द्यायचे होते. मात्र, मुळातच मुंबई मॉडेल फसवे असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.