चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल, समन्वयक दिप्ती पाटील, अश्विनी पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील उपस्थित होते. सुषमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
१लीच्या विद्यार्थ्यांनी विविध बोधपर कथा सादर केल्या. गौतमी कोळी, आराध्या पाटील, रुपेश पाटील,पार्थ मेहेर, लाव्या पाटील, हिमांशू पाटील, श्रिश पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी प्रिशा पवार हिने स्त्रीभ्रूणहत्येवर आधारित एकपात्री नाटिका सादर केली. अंशिका जाधव या विद्यार्थिनीने पुस्तक आणि मोबाईल यांमधील संवाद सादर केला. कनिष्का पाटील या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत मी जिजाऊ बोलते.. ही एकपात्री नाटिका सादर केली.
इयत्ता ३रीच्या विद्यार्थ्यांनी मराठी या मातृभाषेचे महत्त्व सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये यजुर्व पाटील, मानस सैंदाणे मयंक पाटील, गर्वी जैन, सारा सय्यद आणि वेदांत पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीचे विद्यार्थी जय राणे आणि दक्ष जयस्वाल यांनी केले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक तक्ते बनविले. शाळेतील कला शिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका कीर्ती चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.