बेळगाव (वृत्तसंस्था) ‘बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले. मात्र, सभा होणारच ! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिलाय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनानं संजय राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. बेळगाव प्रशासनाकडून संजय राऊत यांच्या सभेच्या व्यासपीठाची मोडतोड केल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीनं करण्यात आला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. बेळगावात राऊतांची प्रचारसभा होणार आहे. पण सभा होण्याआधीच बेळगाव प्रशासनानं सभेला विरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड करण्यास सुरुवात केली आहे. खुद्द संजय राऊत यांनीही या घटनेसंदर्भात एक ट्विट केलं आहे आणि बेळगाव प्रशासनाला कडक शब्दात इशारा देखील दिला आहे.
“बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले..सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीय”, असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी ट्विटमधून दिला आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचं मतदान होणार आहे. तत्पूर्वी बेळगावात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार घेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. बेळगाव मतदारसंघात काँग्रेस, भाजपा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.