चाळीसगाव (प्रतिनिधी) ज्या नात्यात स्वार्थ असतो ते नाते तात्पुरते असते, मी एखादे नाते जोडतो तर ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर प्रामाणिकपणे जपण्यासाठी. गेल्या ४ वर्षांपासून चाळीसगाव तालुक्यातील १५०० हून अधिक आशा अंगणवाडी सेविका यांच्या सन्मानार्थ भाऊबीज सोहळ्याच्या माध्यमातून बहीण भावाचे नाते जोडले गेले आहे. यावर्षी काही कारणामुळे हा सोहळा उशिरा जरी झाला असला या भावाला तुमची कधीच आठवण पडणार नाही. महिला दिन व महाशिवरात्रीच्या पावन पर्वणीवर हा सोहळा आपले नाते अधिक वृद्धिंगत करणारा ठरेल. आपण ग्रामीण भागात जे मोलाचे काम करता त्याबद्दल तुमचे कितीही आभार मानले तरी कमी आहे.२ वर्षापूर्वी सर्व आशा अंगणवाडी सेविका यांच्या एका मुलीच्या विवाहासाठी २५ हजारांची मदत शिवनेरी फाउंडेशन तर्फे देण्याचे जाहीर केले होते. त्यामाध्यमातून आतापर्यंत ७९ विवाहांना मदत शिवनेरी फौंडेशनतर्फे करण्यात आली आहे, आपल्या संस्कृतीत सांगितले आहे की बहीण भाची यांना मदत केल्याने, त्यांच्यासाठी काम केल्याने आपल्याला कमी पडत नाही. आशा अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणेच बचत गट सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या CRP ताई यांच्या एका मुलींच्या लग्नासाठी देखील आर्थिक मदत करण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण केली.
शिवनेरी फाउंडेशनतर्फे चाळीसगाव येथे आयोजित आशा अंगणवाडी सेविका भाऊबीज व बचत CRP यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.देवयानीताई ठाकरे, जिल्हाध्यक्षा सौ.संगीता गवळी, शहराध्यक्षा अॅड सुलभा पवार, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण, श्रीमती नमोताई राठोड, सौ.मोहिनी गायकवाड, रिजवाना खान, सौ.प्रभावती महाजन, सौ.विजयाताई पवार, सौ.वैशाली राजपूत, सौ.मनिषा पगार, सौ.मोनिका गांगुर्डे, जिजाऊ समितीच्या सौ.सोनल साळुंखे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, जेष्ठ नेते धर्मा आबा वाघ, संजय पाटील, धनंजय मांडोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, तुमच्या सुख दुखात हा भाऊ तुमच्या सोबत आहे. आमदार म्हणून सरकार कडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सर्व आशा व अंगणवाडी सेविकांना सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. आशा सेविका यांचे मानधन वाढविण्याबाबत देखील पाठपुरावा केला जाईल. अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर कमीत कमी दीड लाख ग्राज्यूटी व पेन्शन चा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
भगिनींनी केले लाडक्या भावाचे औक्षण, भावजाई ने दिल्या साड्या भेट
राज्यात एकमेव असणाऱ्या अश्या आगळ्यावेगळ्या भाऊबीज सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यातील शेकडो आशा अंगणवाडी सेविका भगिनींनी आपला लाडका भाऊ आमदार मंगेश चव्हाण यांचे औक्षण केले. त्यानंतर भाऊबीज भेट म्हणून भावजाई या नात्याने सौ.प्रतिभा चव्हाण यांनी देखील तालुक्यातील १५०० हुन अधिक आशा अंगणवाडी ताई यांना शिवनेरी फाउंडेशन साडी भेट दिली. रक्ताचा नाही पण हक्काचा असा या भाऊबीज सोहळ्यात सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर अनोखे समाधान झळकत होते.
सोनी तू खाशी तर लवकर मोठी होशी…प्रतिभा चव्हाण यांनी सांगितला आपल्या गावातल्या अंगणवाडी सेविका यांचा किस्सा !
बाळाच्या जन्माच्या आधीपासून ते जन्मानंतर, लसीकरण असो वा खाऊ असो वा बालवाडी असो… आई नंतर बाळाचा पहिला गुरू अंगणवाडी ताई, आशा ताई असल्याचे शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले. मी डोणदिगर सारख्या गावातून येत असल्याने माझ्या जीवनात देखील अंगणवाडी मधील आठवणी आहेत असे सांगताना त्यांनी तेथे उपस्थित आपल्या अंगणवाडी ताई यांची ओळख सर्वांना करून दिली. अंगणवाडी मध्ये मिळणारी खिचडी, वाटाणे घेण्यासाठी त्या आग्रह करायच्या, “सोनी तू खाशी तर लवकर मोठी होशी” असं सांगत जर मी किंवा कुणी बाळ अंगणवाडी मध्ये गेलं नाही तर घरी जाऊन त्या डबा देऊन यायच्या. सुदृढ पिढ्या घडविण्याचे काम आशा अंगणवाडी ताई यांच्या माध्यमातून होत असत. त्यामुळे त्यांच्या जीवनात चार आनंदाचे क्षण आणण्यासाठी काम करता येत असल्याचे मोठे समाधान मिळत असल्याचे देखील सौ.प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
आशा अंगणवाडी सेविका यांच्या जीवन चित्रफितीने पाहून पाणावले उपस्थितांचे डोळे !
खडतर परिस्थितीचे चक्र पार करत आपला संसार प्रपंच व शासनाने दिलेली जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा अंगणवाडी सेविका यांच्या जीवनावर आधारीत ध्वनिचित्रफीत सदर सोहळ्याच्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात दाखविण्यात आल्यात. त्यांचा संघर्ष पाहताना व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून कशी मोलाची मदत झाली हे व्यक्त होताना उपस्थितांचे डोळे पाणावले. मंगेशदादांनी मुलीच्या लग्नासाठी केलेली २५ हजारांची मदत आमच्यासाठी लाखमोलाची होती, सख्खा भाऊ एव्हडी मदत करत नाही. मात्र हक्काचा भाऊ मंगेशदादा आमच्यामागे खंबीरपणे उभा राहतो अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
महाशिवरात्रीचा उपवास असल्याने महिलांसाठी फराळ म्हणून साबुदाणा खिचडी, केळी व थंड ताकाची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवनेरी फाउंडेशन व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय कार्यालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.













