नाशिक (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून १२ वर्षापूर्वी, “मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक” योगेश परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले होते. जगाच्या पाठीवर कोणतीही सरकारी यंत्रणा एकटी आपत्कालीन व्यवस्थापन करू शकत नाही, त्यामुळे खासगी स्वरुपात आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी समाजातील घटकांची जोड आवश्यक असते, याच संकल्पनेतून या पथकाची स्थापना करण्यात आली.
पथकाच्या सुरवातीला ३०० हुन अधिक स्वयंसेवक होते आणि त्यांच्या सहकार्याने आज पर्यंत विविध कार्यक्रम केले गेले, कोपरी पुलाची दुर्घटना, एलिफंटा गुहे जवळील तेल गळती, इंडिया बुल्स जवळील आगीवरील नियंत्रण, कोकणातील पूरपरिस्थितीत लोकांना मदत, दरड कोसळल्यावर मदत, गणपती विसर्जनावेळी जमाव नियंत्रण व इतर अशी असंख्य कामे या पथकाने आतापर्यंत केलेली आहेत.
संस्थेच्या नवीन १५० कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून २ दिवसीय प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. ह्या शिबीरात बृहन्मुंबई महानगरात आज पर्यंत मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाचे ४५० हून अधिक स्वयंसेवक महानगरपालिकेच्या हद्दीत तयार झाले असून येत्या पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरात कमीतकमी ५०० सदस्य बनवण्याचा मानस आहे तसेच अशाच स्वरूपाचे अजून सदस्य संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरात तयार करण्यात येणार आहेत आणि त्याचीच सुरुवात मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधून मनसे आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन नाशिक सातपुर काॅलणी संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी सभागृह येथे येत्या २१ व २२ फेब्रुवारी २०२३ पासून करण्यात येत आहे.
शिबीरा करीता इच्छुक असणार्या उमेदवार यांनी नजीकच्या मनसे पक्षकार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मनसे आपात्कालीन व्यवस्थापन पथकाचे महाराष्ट्र राज्य उपसचिव अतुल पाटील यांनी केले आहे. शिबिरा संदर्भात आज सातपुर येथे बैठक आयोजित करण्यात आली असता त्या बैठकीत मनसे आपात्कालीन व्यवस्थापन पथक संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपसचिव अतुल पाटील, मनसे रस्ते, साधन-सुविधा, आस्थापना विभागाचे नाशिक महानगर संघटक विजय आहिरे, नाशिक शहर उपाध्यक्ष सचिन सिंन्हा, विभाग अध्यक्ष योगेश लबडे, वैभव महिरे, विशाल चौधरी उपस्थित होते.