बोदवड (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्यांचे व तृणधान्यांचे विशेष महत्त्व आहे असे मत तालुका कृषि अधिकारी सी. जे. पाडवी यांनी व्यक्त केले, तसेच सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन आरोग्यास वरदान ठरेल हे सांगत रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची गरज असल्याचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी म्हटले. बोदवड महाविद्यालयात पावसाळी रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महोत्सवाचे उद्घाटन बोदवड येथील कृषि विभागाचे तालुका अधिकारी सी. जे. पाडवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. पावसाळ्यातील सर्वात मोठं आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानभाज्या. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या तसेच अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्या म्हणजे हिरवं धनच .या भाज्या स्वादिष्ट तर असतातच त्याचबरोबर आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक व त्रिदोष हारक देखील असतात. सुदृढ आरोग्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरते. म्हणूनच आपल्या परिसरातील विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचा उपयोग व गुणधर्मांची माहिती सर्वांना व्हावी तसेच अनेक दुर्मिळ व लुप्त होत असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने गो ग्रीन क्लब अंतर्गत दरवर्षी “पावसाळी रानभाज्या महोत्सवाचे” आयोजन करण्यात येते, असे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गीता पाटील यांनी सांगितले.यावर्षी देखील शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी वनस्पती शास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी ,उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी , विभागाचे . पंकज माळी, एन.पी.महाजन, श्री. व्ही. एच. भोसले व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. रानभाज्यांच्या माहितीसाठी पोस्टर्स लावले होते. तसेच प्रत्येक भाजीचे नाव त्यांचे महत्त्व व पाककृती क्यू आर कोडसह उपलब्ध करून देण्यात आली होती. याचबरोबर रानमेवा पाककृती स्पर्धा देखील घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी विद्यार्थ्यांनी कुरडू, मायाळू ,घोळ ,कटुरले, अंबाडी, लाल माठ ,तांदुळजा, केना , फांग ,अळू ,शेवगा अशा अनेक रानभाज्यांच्या विविध पाककृतींनी सर्वांचे लक्ष वेधले. सर्वांनी व विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची चव चाखून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध पाककृतींचे परीक्षण ति.र. बरडीया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना काठोके व रोझ पेटल शाळेच्या सौ. रेखा वेरुळकर यांनी केले. प्रथम क्रमांक कु. करिश्मा तेली हिने तर द्वितीय क्रमांक कु. मोहिनी पाटील व उज्वला चौधरी ह्यांनी तर कु. अपूर्वा पाटील हीने तृतीय क्रमांक पटकावला . अथर्व काजळे याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये तृणधान्य सेवनासंबंधी जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्यांचे वाटप देखील केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रत्ना जवरास ,डॉ. मनोज निकाळजे ,डॉ. चेतनकुमार शर्मा, डॉ. नरेंद्र जोशी, सौ. वैशाली अहिरे, संदीप बरडे, कंचन दमाडे, डॉ. रुपेश मोरे, नितेश सावदेकर, डॉ हेमलता कोटेचा, वंदना नंदवे, रुपाली चौधरी,श्री.आठवले, श्री. यादव, निलेश महाजन, विशाल जोशी, समीर पाटील, जितेंद्र बडगुजर , विजू धोबी ,अतुल पाटील , नामदेव बडगुजर , वैभव माटे , या सर्वांनी परिश्रम घेतले.