छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) मनोज जरांगे-पाटील यांची बदनामी करणारे काही मॉर्फिंग व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केले जाऊ शकतात. अशा खोट्या व्हिडींवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दरम्यान, आंबेडकर यांच्या दाव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी सुभेदारी विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जरांगे पाटील यांची बदनामी करणारे काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्या जाऊ शकतात. त्या खोट्या किंवा मार्फ केलेल्या असतील, त्यामुळे कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्रात सध्या आयाराम गयारामांची नाटकं सुरू आहेत. अनेक नेत्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ते किती खरे किती खोटे माहीत नाही. लवकरच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी काही खोटे, तंत्रज्ञानाचा वापर करून काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जाऊ शकतात. हा जरांगे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून त्यांच्या मागील लोकशक्ती विचलित केली जाईल. त्यामुळे जरांगे यांना राजकीय प्रवास केल्याशिवाय बदनामीपासून वाचणे शक्य नाही, असे मत देखील आंबेडकर यांनी व्यक्त केले.
राज्यातील मंजूर झालेले मराठा आरक्षण टिकविण्यासाठी मनोज जरांगे यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. जरांगे अपक्ष लढल्यास आमचा त्यांना पाठिंबा आहे. जरांगे यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आरक्षणाचं बिल जे विधानसभेत मंजूर झालं आहे, ते टिकवणं ही आहे. ते बिल टिकवायचं असेल तर त्यांनाच आता राजकीय पुढाकार घ्यावा लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीत मराठा मतदारांचा प्रस्थापित मराठा उमेदवारांना फटका बसणार आहे. प्रत्येक गावातून अधिक उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक बॅलेटवर घ्यावी लागेल. भाजपला निवडणुकीत २२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणार नाही’, असे आंबेडकर म्हणाले.














