जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात मुंबई एनसीबीच्या पथकाने गांजाने भरलेला ट्रक प्रकरणाचे जळगाव कनेक्शन समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, एनसीबी (NCB) जळगावातील गांजाच्या ट्रकची खेप स्वीकारणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर त्याच्या आस्थापनांवर छापेमारीच्या तयारीत असल्याचे देखील कळतेय. तर दुसरीकडे एनसीबीच्या म्हणण्यानुसार, नांदेडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या दिलेल्या वृत्तानुसार NCB जळगावात गांजाची खेप स्वीकारणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे तो व्यक्ती ड्रग्जच्या गुन्ह्यात अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे एनसीबी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध घेत आहे. तसेच जळगावातील त्याच्या आस्थापनांवर छापे टाकण्याच्या तयारीत असल्याचेही कळते. एनसीबीकडून गांजाच्या या खेपचा पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, एनसीबीच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. यात गोकुळ राजपूत आणि सुनील महाजन यांचा समावेश आहे. यातील गोकुळ राजपूत हा ट्रकचा मालक असून ज्यावेळी एनसीबीच्या पथकाने ट्रक अडवला, त्यावेळी तोच ट्रक चालवत होता.
गांजा तस्करीची खास पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी अनोखी पद्धत वापरत होते. वाहक चालकाला अटक केल्यानंतरही मूळ पुरवठादाराशी संबंध जुळून येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात होती. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर तस्करांच्या कार्यपद्धतीमध्ये लोकांच्या साखळीचा समावेश होता. त्यामुळे पहिल्या माहित नसायचे की दुसरा कोण आहे? आणि दुसऱ्या माहित पडायचे नाही की पहिला कोण होता?. प्रत्येक वेळी ड्रायव्हर आणि क्लिनर बदलले जातात. विशेष म्हणजे या दोघांना हे देखील माहित नसते की ट्रकमध्ये नेमकं काय आहे?. एनसीबीच्या पथकाने पकडलेल्या या दोघं संशयितांनी सांगितले की, त्यांना जळगाव येथे फक्त गांजा पोहोचवण्याचे काम देण्यात आले होते. एवढेच नव्हे तर जळगावहून पुणे, मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांमध्ये छोट्या प्रमाणात गांजा वितरीत केला जाणार होता.
विशाखापट्टणम माल लोड आणि डिलिव्हरी जळगावात !
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) नांदेड जिल्ह्यातील कारवाईत एनसीबीने तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचं देखील विशाखापट्टणम कनेक्शन समोर आलंय. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या ३,००० किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन उघड झाले होते. नांदेडमध्ये पकडण्यात आलेल्या गांजाने भरलेला ट्रक विशाखापट्टणममध्ये लोड झाला होता. त्यानंतर हा ट्रक जळगाव अर्थात एरंडोल जवळील वनकोठे येथे येणार होता आणि मग येथून महाराष्ट्राच्या उर्वरित भागात वितरीत होणार होता. जळगावच्या व्यक्तीनेच मालची बुकिंग केल्याचे देखील उघड झाले आहे. दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मुक्ताईनगर-जळगाव मार्गे तस्करी होणाऱ्या गांजाची मोठी खेप एमआयडीसी पेालीसांच्या हाती लागली होती. लाखो रुपये किंमतीचा जवळपास सहा टन(६३६ किलो) इतका मोठा गांजाचा साठा एमआयडीसी पोलीसांनी जप्त केला होता. विशेष म्हणजे या गांजाच्या देखील कनेक्शन विशाखापट्टणम सोबत असल्याचे समोर आले होते.
नक्षलवादी कनेक्शनही तपासणार एनसीबी
एनसीबीच्या सूत्रांनी पुढे माहिती दिली की, ज्या ठिकाणी ड्रग्ज लोड केले गेले ते ठिकाण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या नक्षल पट्ट्याजवळ आहे आणि म्हणूनच, एजन्सी या प्रकरणात नक्षल कनेक्शन देखील नाकारत नाही. तसेच याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे देखील सूत्रांनी सांगितले. तर ही गांजाने भरलेल्या ट्रकची खेप आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी काल दिली होती. ही खेप जळगाव जिल्ह्यासाठी आरक्षित करण्यात आली होती पण ती नांदेडमध्ये अडवून जप्त करण्यात आली होती, असे वानखेडे यांनी काल पत्रकारांना सांगितले होते.