बोदवड (प्रतिनिधी) नाथाभाऊंनी बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवलेली, रोहिणीताईंनी पूर्ण करावी, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते तालुक्यातील वराड येथे जनसंवाद यात्रेत बोलत होते.
पुरुषोत्तम पाटील आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, रोहिणीताई खडसे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा कौतुकास्पद आहे. त्या माजी मंत्री व तीस वर्षे आमदार असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत. अशा मोठया नेत्यांची मुले परदेशात किंवा उद्योग धंद्यात स्थायिक होतात किंवा स्वतः संघर्ष न करता वडिलांच्या पुण्याईने राजकारण करतात. परंतू रोहिणीताई याला अपवाद आहेत. नाथाभाऊ सारख्या मोठ्या व्यक्तीच्या कन्या असून सुद्धा त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगामी काळात हीच जनता रोहिणीताईंच्या पाठीशी उभी राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच बोदवड तालुक्याचा मुख्य प्रश्न हा शेतीचे पाणी आहे. त्यासाठी नाथाभाऊ यांनी बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. रोहिणी खडसे या ती योजना पूर्णत्वास नेण्यास प्रयत्न करतील व पूर्ण करतील असा विश्वासही पुरुषोत्तम पाटील यांनी व्यक्त केला.