मुंबई (वृत्तसंस्था) आज २ ऑक्टोबर रोजी गांधीजींची १५२ वी जयंती साजरी होत आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी गांधीजींना अभिवादनपर संदेश देत त्यांना आदरांजली वाहिली. पण अशातच गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विटरवर “नाथूराम गोडसे जिंदाबाद” असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने याला आक्षेप घेतलाय.
हा हॅशटॅग हटवून ट्रेंड करणाऱ्यांचे अकाऊंद बंद करावेत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ‘नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशवादी आहे. त्याच्या समर्थनार्थ ट्विटरवर चालविण्यात आलेले ट्रेंड ब्लॉक करावेत. आणि ट्रेंडमध्ये सामील झालेल्यांचे अकाऊंट बंद करावे, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री यांनी ट्विटर इंडियाकडे केली आहे.
३० जानेवारी १९४८ महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. गांधीहत्येच्या १० दिवस आधीही त्यांच्या हत्येचा एक अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. या प्रयत्नामागे पार्श्वभूमी होती ती फाळणी आणि ५५ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाची. २० जानेवारी १९४८ ला गांधीजींच्या प्रार्थना सभेत बाँब फेकण्यात आला होता. मदनलाल पहावा नावाच्या शरणार्थ्याने फेकलेला बाँब गांधीजींपासून थोड्याच अंतरावर फुटला होता. यामुळे कोणाला दुखापत झाली नव्हती पण सभेत गोंधळ उडाला. मदनलाल शरणार्थी होता आणि त्यानं चिडून गांधीजींवर बाँब फेकला असाही समज होऊ शकतो पण मदनलालने दिलेल्या कबुलीजबाबावरून तो कट होता हे समोर आलं होतं. कटात सहभागी असलेल्यांची नावे त्याने सांगितली होती. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे कटाचे सूत्रधार होते तर विष्णू करकरे, शंकर किश्तया आणि दिंगबर बडगे यांचाही सहभाग होता असं मदनलालने सांगितलं होतं. त्यानंतर नथुराम गोडसेने इतर गटातील सहकाऱ्यांना सांगितलं की, कोणाच्याही मदतीशिवाय मी गांधीहत्या करणार. दरम्यान, यासाठी एक दिवस आधी नथुराम आणि आपटे २९ जानेवारीला दिल्लीत पोहोचले होते. ३० जानेवारीला प्रार्थनेसाठी येत असलेल्या गांधीजींवर गोडसेनं गोळ्या झाडल्या. यातच गांधीजींची प्राणज्योत मालवली. आता गांधींच्या याच मारेकऱ्याच्या समर्थनार्थ दुर्दैवाने ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे.