जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्यातून पोलिसांचे एक पथक रविवारी सकाळी जळगावात धडकले. परंतू या कारवाईची माहिती संशयितांना तीन दिवस आधीच होती, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर, दोन दोन दिवसांपूर्वीच महेंद्र भोईटेच्या घरातून दोन रिक्षा भरुन कागदपत्र रवाना झाल्याची देखील चर्चा आहे.
पोलिसांच्या कारवाईची बातमी आधीच फुटली ?
१३ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रविवारी पुणे पोलिस जळगावात आले होते. पोलिसांचे पथक कारवाईसाठी येणार अशी माहिती संशयितांना तीन दिवसांपूर्वीच मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळेच पुणे पोलीस येणाच्या आधी कोल्हेनगरात राहणाऱ्या महेंद्र भोईटे याच्या घरातून दोन रिक्षा भरुन कागदपत्र रवाना झाल्याचे समोर येत आहे. यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईची बातमी आधीच फुटली, अशी जोरदार चर्चा जळगावात सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वीच महेंद्र भोईटेच्या घरातून दोन रिक्षा भरुन कागदपत्र रवाना?
महेंद्र भोईटे याच्या घराबाहेर दोन ७ जानेवारी (शुक्रवार) रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन रिक्षा येऊन उभ्या राहिल्या. या रिक्षांमधून संस्थेच्या संदर्भातील कागदपत्रे इतरत्र हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोईटे गटाने सहकार कायदा न मानता धर्मदायच्या नोंदणीनुसार संस्था आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. धर्मदायच्या कार्यपद्धतीनुसार संस्थेत घेण्यात आलेल्या जनरल मिटींग, ठराव यां संदर्भातील सर्व कागदपत्र महेंद्र भोईटेच्या घरात ठेवलेले होते. हे कागदपत्र तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठारणार होते. परंतु, पोलिसांच्या हालाचलींबद्दल आधीच माहिती मिळाल्यामुळे संशयित दोन दिवसांपासूनच जळगावातून पसार झाले होते. एवढेच नव्हे तर, त्यांनी संस्थेचा रेकॉर्डदेखील इतरत्र हलवल्याचे बोलले जात आहे.
पाच जणांच्या घराची एकाच वेळी झाडाझडती
मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात द्यावी यासाठी दबाव टाकून अॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करत त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली. याप्रकरणी कोथरूड पोलिसात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्यातून पोलिसांचे एक पथक रविवारी सकाळी जळगावात धडकले होते. या पथकाने एकाच वेळी नीलेश रणजित भोईटे, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईटे, प्रमोद जयंतराव कोळे व प्राचार्य डॉ. लक्ष्मण प्रताप देशमुख या पाच जणांच्या घराची सकाळी आठ वाजेपासून झाडाझडती घ्यायला सुरुवात केली होती. दरम्यान, संशयित प्रमोद काळे यांच्या घरझडतीत मविप्र संस्थेचे शिक्के व कागदपत्र मिळून आली. काळे हे सेवानिवृत्त असून देखील त्यांच्याकडे संस्थेचे दप्तर आढळून आल्याचे कळते.
‘या’ ९ जणांवर ‘मकोका’
या गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या नऊ जणांवर ऑक्टोबर २०२१ मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले होते.
ही कारवाई आधीच अपेक्षित होती : नीलेश भोईटे
या गुन्ह्याचा तपास उशिराने होतो आहे. पुण्याच्या घरी पोलिसांनी छापा मारला तेव्हा मी तेथे हजर होतो. त्यांना अावश्यक असलेले कागदपत्र पुरवले आहेत. पोलिसांच्या पथकाला तपासात सहकार्य केले आहे. हा सर्व तपासाचा भाग आहे. आम्हाला ही कारवाई आधीच अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया नीलेश भोईटे यांनी माध्यमांसोबत बोलतांना दिली आहे.