मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरण भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. याप्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणी आता कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. याप्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. आमदार सुनील प्रभू यांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना कारवाईविषयी आश्वस्त केले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलीस अधीक्षक स्वत: याप्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली. कोणत्याही आरोपीला पोलिसांकडून सोडले जाणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. रविवारी कणकवली पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. अर्धा तास चौकशी करुन त्यांना जाऊन देण्यात आले होते. मात्र, संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचे खरे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यामुळे याप्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे
‘सूड भावनेने कारवाई झाल्यास न्यायालयात जाऊ’ – नारायण राणे
संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी नितेश राणे हे अज्ञातवासात नसल्याचे स्पष्ट केले. नितेश हे सिंधुदुर्गातच आहेत. ते आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. आमच्यावर सूडाच्या भावनेने आरोप केले जात असतील तर कोर्टात तर जावे लागेल. असरकारला काय करायचं ते करु द्या. नितेश राणेंनी काहीही केलं नाही. त्यांनी कोणाला मारलं नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांना फिरवला फोन, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
संतोष परब हल्लाप्रकरणात कणकवली पोलिसांच्या कारवाईला वेग आल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप असणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर काहीवेळापूर्वीच नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकलेला नाही. परंतु, कारवाई टाळण्यासाठी कशाप्रकारे बचाव करता येईल, याविषयी फडणवीस यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला असल्याची शक्यता आहे. त्यानुसार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
सभागृहात नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी
दरम्यान, राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी शिवसेनेकडून सोमवारी भाजप आमदार नितेश राणे यांची सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे जोरदार कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी नितेश राणे यांना सभागृहातील नेत्यांनी समज दिली होती. मात्र, त्यानंतरही नितेश राणे आदित्य ठाकरेंविषयी चुकीची भाषा वापरत आहेत. तसेच मी हे बोलणारच, असेही ते सांगतात. अशा सदस्याला सभागृहातून कायमस्वरुपी निलंबित केले पाहिजे. एकतर त्यांना निलंबित करावे, अन्यथा नितेश राणे यांनी सभागृहात हात जोडून माफी मागावी. चुकीला माफी नाही. अन्यथा काळ सोकावेल, असे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. शिवसेनेच्या सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.