नागपूर (वृत्तसंस्था) राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी भेट झाली. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि २०२४ लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. भाजपचे फाइंड असणाऱ्या किशोर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं. आता, हेच प्रशांत किशोर राष्ट्रवादीच्या पवारांना भेटायला आल्याने काही नवीन गणिते जुळत आहेत का याची चर्चा रंगली होती. या भेटीनंतर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्ट्रॅटेजीचं उत्तर दिलंय.
कोणी कोणाची भेट घ्यावी, यावर कुठलही बंधन नाही. विरोधी पक्षाचे लोकं असू द्या, किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असू द्या. प्रत्येकजण आप-आपली स्ट्रॅटेजी तयार करत असतात. कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या तरी आजही मोदीच आहेत आणि २०२४ लाही मोदीच राहणार आहेत. २०२४ च्या निवडणुकांतही मोदींच्या नेतृत्वातच भाजपाचं सरकार येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या भेटीवरुन शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनीही या भेटीचं स्वागत केलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. परिणामी हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या सरकारमधील नेत्यांना सकाळी उठून जे वाक्य सर्वात आधी तोंडात येतं ते म्हणजे अमुक बाबीसाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीका फडणवीसांनी केलीय.
















