जाणून घ्या…कसा असू शकतो नव्या सरकारमधील मंत्रीपदाचा फॉर्म्युला?
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास मत ठराव मांडण्यात येणार आहे. मात्र, हा ठराव भाजप मांडणार नसून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू दाखल करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांचे विधानसभेत त्यांच्यासह दोन सदस्य आहेत. येत्या दोन दिवसांत बच्चू कडू हे राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र सादर करणार असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात.
भाजप-शिंदे गटाचा असा आहे नव्या सरकारमधील मंत्रीपदाचा फॉर्म्युला?
भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह एकूण 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपकडे या सूत्रानुसार 28 मंत्रीपदे मिळणार आहेत.
लवकरच मंत्रिमंडळाचा अंतिम ड्राफ्ट तयार होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी रवाना झालेले आहेत. अशा स्थितीत आता एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या खातेवाटपाबाबतच्या मागण्यांबाबत आता दिल्लीतच चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या मागण्या किती मान्य होतात, यावर सत्तास्थापनेचा पुढचा घटनाक्रम ठरण्याची शक्यता आहे.