मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awad) यांचाही समावेश असल्याने राष्ट्रवादीमध्ये द्विधा मनस्थिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या नथुराम गोडसेंच्या भूमिकेतील चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. ३० जानेवारीला हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रोमो प्रदर्शित होताच विविध स्तरातून विरोध होऊ लागला आहे. अनेक राजकीय पक्षांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जितेंद्र आव्हाडांचा विरोध
कोल्हे यांच्या भूमिकेला त्यांच्याच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुराम गोडसेची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय हा वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने अमोल कोल्हे यांनी ती भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या, त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनीच विरोध दर्शविला आहे.
कोल्हेंचे स्पष्टीकरण
यावर खासदार कोल्हे यांनी सोशल मिडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.”असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले.