मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भाजपकडून खासकरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकार देखील भाजपला जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे बाहेर येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. घोटाळे उघड करण्यासाठी विशेष समिती तयार केल्याची देखील माहिती देखील सूत्रांनी दिली माहिती आहे.
भाजपकडून खासकरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ, अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि अन्य काही नेत्यांवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. यावर महाविकास आघाडीकडून आरोपांचं खंडण केलं जात आहे, आरोप फेटाळले जात आहेत. तसेच काही मंत्र्यांनी सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावा देखील करण्याबाबत सांगितलं आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची पोलखोल करण्यासाठी विशेष समिती तयार केल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. समितीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील एका सदस्यांचा समावेश असणार आहे. यामुळं लवकरच भाजपच्या माजी मंत्र्यांची देखील घोटाळ्याची प्रकरणे बाहेर येणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कोल्हापूरच्या मातीत येऊन शड्डू ठोकणार होते; परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना भल्या सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरविले आणि त्यानंतर दिवसभर नेतेमंडळींच्या आरोपांच्या फैरी झडल्या. कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते. ठाकरे कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याची माहिती घेण्यासाठी आणि बेनामी मालमत्तेचा हिशेब करण्यासाठी लवकरच अलिबागला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी येथे केला होता.