नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी सत्ता हातात येताच महिलांसदंर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. याबाबत प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे आरएसएसच्या जुन्या पोशाखात दिसून येत आहेत. त्यामध्ये, या सर्वच नेत्यांनी खाकी हाफ चड्डी परिधान केली आहे. प्रियंका यांनी या फोटोसह कॅप्शनही दिले आहे. ‘अरे देवा… यांचे गुडघे दिसत आहेत’.
तिरथसिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारताच वादाला सुरुवात झाली आहे. रावत यांनी सत्ता हातात येताच महिलांसदंर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. महिलांच्या कपड्यांविषयी केलेलं हे वक्तव्य चांगलच चर्चेत आलं आणि अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी फाटलेली जिन्स घालणं म्हणजे संस्कार नाही. मंगळवारी बाल अधिकार संरक्षण आयोगच्या एका कार्यशाळेचं उद्घाटन करताना त्यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर, देशभरातून महिलांनी संताप व्यक्त केला असून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीनीही रावत यांच्यावर जबरी टीका केली आहे.
आजकाल महिला फाटलेली जिन्स घालून फिरताना दिसतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का? लहानांना लागणारे संस्कार हे मोठ्यांकडून येत असतात, असे विधान रावत यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळं सोशल मीडियावरही त्यांना चांगलंच ट्रोल व्हावं लागलं. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिनेही रावत यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं मुख्यमंत्र्यांनाच आपली मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे. तर, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांचा आरएसएसच्या पोशाखातील फोटो शेअर करत प्रहार केला आहे.
प्रियंका गांधींनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे आरएसएसच्या जुन्या पोशाखात दिसून येत आहेत. त्यामध्ये, या सर्वच नेत्यांनी खाकी हाफ चड्डी परिधान केली आहे. प्रियंका यांनी या फोटोसह कॅप्शनही दिले आहे. ‘अरे देवा… यांचे गुडघे दिसत आहेत की…’, असे प्रियंका गांधींनी म्हटलंय.
काय म्हणाले होते रावत?
फाटक्या जीन्सच्या वापरावरून तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले की, ‘मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते’.
काय म्हणाली अमिताभची नात
नव्यानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं, की आमचे कपडे बदलण्याआधी स्वतःची मानसिकता बदला. यात ही गोष्ट हैराण करणारी आहे, की समाजात कशाप्रकारचा संदेश दिला जात आहे. या विधानामुळे नव्याला आपला राग इतका अनावर झाला की तिनं गुडघ्यावर फाटलेल्या जीन्समधील आपला फोटोदेखील पोस्ट केला. तो फोटो शेअर करत नव्यानं लिहिलं, मी माझी फाटलेली जीन्स घालेल. खूप गर्वानं घालेल. धन्यवाद. अमिताभ यांच्या नातीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.