मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा खडसे यांचा असणार आहे, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असं म्हणत सूचक इशारा दिला आहे.
ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय तर तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असं म्हणत खडसेंनी महाजनांवर जोरदार टीका केली आहे.
शिंदे आणि भाजप यांच्या भानगडी होणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं माझे 50 आमदार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. शिंदेंनी मुक्ताईनगर, पाचोरा, जळगावचे आमदार निवडून आणलेच पाहिजे. मग काय भाजपचे बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांची गरज काय? भाजपचा पत्ता कट झाल्यानंतर यांच्यात पुढे चांगल्याच भानगडी होतील. शिंदे गटाच्या 50 आमदारांचे तिकीट वाटप करून मोकळे झाले त्यामुळे भाजपाच्या 50 आमदारांचा तिकीट आता कापले जाणार हे खरं आहे, असा दावाच खडसेंनी केला.