नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनामुळे निधन झालं आहे. रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघंही गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि रुग्णालयात उपचार सुरू होते.
माजी भारतीय हॉकीपटू आणि प्रशिक्षक एमके कौशिक यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. कौशिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या टीम इंडियाचे सदस्य होते. कौशिक यांना दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. कौशिक यांच्या मृत्यूमुळे हॉकीसह क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
कौशिक यांच्या पत्नींनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कौशिक यांनी हॉकीसाठी अमूल्य योगदान दिलं होतं. ते १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठीचे हे अखेरचे पदक ठरले. यानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीसाठी पदक मिळवता आलेले नाही. कौशिक यांनी प्रशिक्षक पदाचीही जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. कौशिक यांनी टीम इंडियाच्या महिला आणि पुरुष संघाला हॉकीचे धडे दिले होते. कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली २००२ मध्ये भारतीय महिला हॉकी टीमने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण कमाई केली होती.
कौशिक यांच्यासोबत आज सकाळी माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचही कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या ६५ वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांची मागील २ आठवड्यांपासून कोरोना विरुद्ध झुंज सुरु होती. त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी लखनऊ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाल देखील १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते.
















