मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. या संकट काळातही राजकीय नेत्यांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावेळी संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. कोरोना महामारीत मुंबईत चतांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय.
पुण्यात म्युकरमाकोसिसचे किती रुग्ण?
राज्यात म्युकरमाकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात म्युकरमाकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे एकूण ३५३ रुग्ण आहेत. तर म्युकरमाकोसिसने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१२ म्युकरमाकोसिसचे रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पुण्यात म्युकरमाकोसिसचे ११५ रुग्ण आहेत.
प्रसाद लाड यांचं जोरदार प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार लाड यांनी केलाय. तसंच बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिलाय. मुंबई महापालिकेत २ हजार २०० कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही लाड यांनी केलाय.