जळगाव (प्रतिनिधी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, या संस्थेची प्रवेश प्रक्रिया १ डिसेंबर, २०२० पासून सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रीयेच्या २३ डिसेंबरपर्यंत एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी २९ व ३० डिसेंबर, २०२० रोजी होणार आहे.
तरी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय रिक्त जागांसाठी प्रवेशइच्छूक उमेदवारांना व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करुन जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉगिन करुन कोणत्याही एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरीता २५ व २६ डिसेंबर, २०२० सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. २७ डिसेंबर, २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांची जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संगणक प्रणालीव्दारे गुणवत्ता यादी प्रकाशीत केली जाईल व तशी माहिती त्यांना एसएमएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. दिलेल्या वेळेस व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुदपदेशन फेरीकरीता बोलविण्यात येईल व प्रवेशाकरीता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची आर्हता या आधारावर दि. २९ व ३० डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रीयेच्यावेळी जागांचे वाटप केले जाईल. या प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.