नागपूर (वृत्तसंस्था) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर हल्ला चढवला. ‘माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन,’ असं फडणवीस म्हणाले.
पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. आम्ही काढलेला अध्यादेश या सरकारनं लॅप्स केला. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग, केवळ महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण का रद्द झालं, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.