बारामती (वृत्तसंस्था) सरकारच्या नाकर्तेपणामुळे शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बचाव करावा लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या शरद पवार यांना दररोज सरकारचा बचाव करावा लागतोय. कारण, या सरकारचा नाकर्तेपणा उघड झालाय. अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच बसून होते. आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघात परतले, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.
फडणवीस यांनी आजपासून बारामतीतून अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पाहणीला सुरुवात केली. बारामती तालुक्यातील उंडवडी येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतीच्या प्रश्नांसोबतच राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली. करोनाच्या काळात घरात बसून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं पवारांनी समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री मुंबईत थांबून राज्यभराचा आढावा घेत असतात. आम्हीही त्यांना माहिती देत असतो, असं पवार म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी पवारांना टोला हाणला. राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याचं व सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम पवार साहेबांकडे आहे,’ असं फडणवीस म्हणाले.