नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना रोखण्यासाठी जगभरात वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दिवसरात्र एक करून लस निर्मिती करण्याचे काम करत आहेत. दरम्यान, देशातील अशाच तीन मोठ्या करोना लसीची निर्मिती करणाऱ्या टीमसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लस निर्मितीमध्ये गुंतलेल्या जीननोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यासंबंधीचे टि्वट कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
“करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात गुंतलेल्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी आज ३० नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करतील” असे पीएमओच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतीच अहमदाबादच्या झायडस पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टि्टयूटला भेट दिली. यावेळी त्यांनी लस निर्मितीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आज मोदी तीन टीम्स सोबत चर्चा करणार आहेत.
पंतप्रधानांनी सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी तासभर चर्चा केली. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. सध्या देशासह जगाचे लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागले आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे.