मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं लवकरच निलंबन होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबन प्रस्तावाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परमबीर सिंह यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.
आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंह यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.
याआधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं होतं.