अकोला (वृत्तसंस्था) कोरोनानंतर लॉकडॉऊन लावल्याने लोकांचे होत हाल होते. असे होत असताना संघप्रमुख डॉ. मोहन भागवतंनी पंतप्रधानांना परिस्थितीची जाणीव करुन दिलीच नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. देशभरात लोकांचे हाल होत असताना संघ आणि भाजपने बघ्याची भूमिका घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमध्ये माणसाला किंमत नाही. सोबतच आरएसएस-भाजपच्या शासनात माणूस आणि माणुसकीला किंमत नसल्याचा टोला, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी लगावला. ते ऑनलाईन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्या कार्यक्रमात बोलत होते.
या भाषणात अनेक मुद्द्यांवरुन प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. देशात कोरोनाची स्थिती गंभीर होण्यासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचं आंबेडकर म्हणाले. मोदींनी स्वत:चा ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देशात आणत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम केल्याचं ते म्हणाले. येथूनच देशात कोरोनाचा फैलाव व्हायला सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केंद्र सरकारवर केला आहे. मोदींनी देशवासियांना कोरोनाची भीती दाखवली. मोदींनी कोरोनाशी लढायचं केलेलं आवाहन ठीक होतं. मात्र, हे करताना सहा महिन्यांपेक्षा अधिक दीर्घकालीन लॉकडॉऊनची आवश्यकता होती का?, असा सवाल आंबेडकरांनी पंतप्रधानांना केला. लॉकडॉऊन’ काळात मोदींनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल थांबवण्यासाठी देशभरात ‘कम्युनिटी किचन’ची संकल्पना का राबविली नाही?, असा प्रश्नही आंबेडकरांनी केंद्र सरकारला विचारला.
प्रकाश आंबेडकरांनी केंद्राच्या तिन्ही कृषी विधेयकांवरही जोरदार टीका केली आहे. किमान आधारभूत मूल्याबाबत या विधेयकात काहीच ठोस तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या विधेयकाला काही राज्यांनी टोकाचा विरोध केला आहे. कृषी विधेयकात संशोधन करणार पंजाब आणि कृषी विधेयक नाकारणाऱ्या राज्य सरकारांविरोधात ५६ इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम ३५६ वापरत बरखास्त करणार का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या क्षेत्राचं खाजगीकरण चालवल्याचं धोरण चुकीचं असल्याचं आंबेडकर म्हणाले. केंद्रातील कंगाल सरकार देशाची संपत्ती विकायला निघाल्याचं ते म्हणाले. हे खाजगीकरणाचं धोरण केंद्र सरकार अंबानी, अदाणींसाठी राबवत असल्याचा त्यांनी आरोप केला.