मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही.”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच, “प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे? याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.” असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
याचबरोबर “देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवारांची इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते, मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपाच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल.”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतरही प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विरोधकांकडून २०२४ मध्ये भाजपाला तगडं आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे.