मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम करणार नसल्याची मोठी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली होती. त्यानंतर ते काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत कोणती रणनीती ठरणार याकडे राजकीय वर्तुळातील सगळ्याचेच लक्ष लागले आहे. ही भेट केवळ महाराष्ट्रापुरती नसून ती राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२४ च्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींविरोधात पर्याय शोधण्यासाठी विरोधकाकडून चाचपणी सुरू असल्याची सध्या चर्चा आहे.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. प्रशांत किशोर यांच्यामुळे ममता बॅनर्जीचा विजयही सोपा झाला होता. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रणनीतीकार म्हणून काम केले आहे. या पार्श्वभूमी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत नक्की काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता आहे. या भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात जरी असलं तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची राहील.