चोपडा (प्रतिनिधी) : “अट्टल जुगारी म्हणजे शेतकरीच,” असे म्हणत गोविंद महाराज गायकवाड यांनी शेतकरी आणि शेतीच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य केले. माणसाच्या बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाच्या लहरीपणात वाढ झाली आहे. या परिस्थितीला निसर्गच नाही, तर माणूसही जबाबदार आहे. त्यामुळे प्रत्येकाने कर्तव्य म्हणून झाडे लावली पाहिजेत. माणूस विज्ञानात प्रगत झाला असला, तरी निसर्गावर मात करू शकलेला नाही. उष्णता, वारा, पाऊस यासारख्या गोष्टी आजही ईश्वराच्या अधीन आहेत. झाडे लावली नाहीत, तर पाणी मिळणारच नाही. झाडे लावणे ही काळाची गरज आहे. “निसर्गाचे रक्षण केले तरच पुढच्या पिढीचे रक्षण होईल,” असे प्रतिपादन गोविंद महाराज गायकवाड यांनी केले.
येथील नगर वाचन मंदिराने आयोजित ५५ व्या शारदीय व्याख्यानमालेचा प्रारंभ गोविंद महाराज गायकवाड (देवाची आळंदी) यांच्या “विनोदातून समाज प्रबोधन” या विषयावरील भारुड सादरीकरणाने झाला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले. वक्त्यांचा सत्कार अध्यक्ष आशिष गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.
मंचावर उपाध्यक्ष प्रा. एस.टी. कुलकर्णी, कार्यवाह डॉ. परेश टिल्लू उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रायोजक आणि माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी यांचा सत्कार करण्यात आला. वक्त्यांचा परिचय अवधूत ढबू यांनी करून दिला. तसेच, वक्त्यांचे साथीदार संतोष महाराज, गौरव रूपे, मयूर आवटी आणि योगेश भोंम्बे यांचाही सन्मान करण्यात आला.
गोविंद महाराज गायकवाड यांनी भारुडाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांवर विनोदातून कोरडे ओढले. त्यांनी एकनाथ महाराजांच्या “प्रमाण, ज्ञान, वैराग्याचा जोगवा” या विचारसरणीवर आधारित संदेश मांडला. भारुड ही फक्त लोककला नसून, ती ज्ञानेश्वर आणि एकनाथ महाराजांनी मांडलेली भावना आहे. त्यांच्या विनोदी सादरीकरणाने श्रोते हसत-हसत लोटपोट झाले. कार्यक्रमास माजी विधानसभाध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्यासह शेकडो श्रोते उपस्थित होते.