मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये म्हणून केंद्र सरकारकडून कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. आपण केलेल्या आरोपांबाबत मलिक यांनी पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा” अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली आहे. मलिक यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे स्टेटमेंट केले आहे. रेमडेसिवीर देण्यात राज्य सरकारच अपयशी ठरले आहे. ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. त्यामुळे स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नवाब मलिक आरोप करत आहेत. इतर राज्यातील कंपन्या रेमडेसिवीर देण्यास तयार आहेत. एफडीएचे अधिकारी काळे यांनी तसा या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्र न् दिवस बैठका घेऊन काम करत आहेत. इकडे मलिक एक बोलत आहेत तर आरोग्य मंत्री राजेश टोपे दुसरंच बोलत आहेत. राजकीय उद्देशानेच केवळ बोललं जात आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खालल्या जातंय, असं सांगतानाच मलिक यांनी नुसते आरोप करू नयेत. राजकीय स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. त्यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा राजीनामा देऊन माफी मागावी, असं दरेकर म्हणाले. मलिकांनी पुरावे दाखविल्यास आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, असंही ते म्हणाले.
नागरिकांना तातडीने ऑक्सिजन उपबलब्ध करून देण्याची गरज आहे. हे पाच दिवस खूप महत्त्वाचे आहेत. ऑक्सिजनसाठी लोक धावत आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तेव्हा ऑक्सिजन उपलब्ध झालं. नाही तर ६३ रुग्ण जीवाला मुकले असते. ठाणे आणि मिराभाईंदरमध्ये तिच परिस्थिती आहे. अन् प्रत्येक गोष्टीचं खापर मात्र केंद्रावर फोडलं जातंय, असं ते म्हणाले.
ठाकरे सरकारने निर्लज्ज राजकारण थांबवावे – दरेकर
“ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधाच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत नसल्याचे रेल्वेमंत्री गोयल यांनी आकडेवारीनुसार दाखवून दिले आहे. ठाकरे सरकारने ‘जनाची नाही तर मनाची’ बाळगून या विषयावर चालू केलेले निर्लज्ज राजकारण थांबवावे”, अशी टीका देखील दरेकर यांनी केली आहे. लोक मरतायत, आरोग्य व्यवस्था खोळंबली आहे. ऑक्सिजनअभावी लोक मरतील अशा अराजकाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा घाणेरडा प्रकार सरकार करतंय. हे दुर्दैवी आहे. नवाब मालिकांनी पूरावे द्यावे, माफी मागावी अन्यथा राजीनामा द्यावा.